Thursday, December 07, 2006

व्यथा

मन मोठे चंचल बेटे सांगून नाही ऐकत
नकोस गुंतू कुठेही म्हटले तरी नाहीच त्याला पटत ॥

कळत नकळत लाखो वेळा घ्यायचे शहाणपण विकत
आयुष्य घालवायचे का हरघडी नवे नवे शिकत ॥

मागून येऊन पुढे कोणी जातात, स्व-चालीने चालत
निर्बंध मात्र जुने नवे राहायचे आपणच का पाळत?

कोणासाठी कोणी नाहीच कधी थांबत
आपण मात्र साऱ्यांसाठी राहायचे असते चालत ॥

मार्ग असतो पळत आणि जीवनाला वळवत
आयुष्य कसे घालवायचे मार्गावरून अडखळत?

कथा या सुख दु:खाच्या नाहीच कधी सरत
क्षण मात्र दुर्मिळसे कधीच येत नाहीत परत ॥

सांगायचे कोणाला काय नाहीच काही कळत
कोणीच नाही आपले हेच बसायचे आळवत ॥

आपण एकटे जीव एकटा नि मनही एकटे असते
ऐकायला वेडे मनोगत कुणीच उरलेले नसते ॥

प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥

ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥

तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥

एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,
नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥

एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,
नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥

सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,
नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥

प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,
एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥

प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,
पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते ॥

हे विश्व भावनांचे..

राहील नित्य प्रीती- नसेन मीही जगती
देईल नित्य कीर्ती राहील हीच महती ॥

मद क्रोध मोह सारे, कोळून प्राशिले मी
त्यागून सर्व काही उरते तरीही प्रीती ॥

मी कोण काय कुठची? सामान्य एक नारी
घडणे न काही हाती, इच्छिन हेच अंती ॥

रुसवा तुझा फुकाचा, हा खेळ रे क्षणाचा
देऊन सर्व काही, वाढो दिगंत कीर्ती ॥

का रे असा दुरावा? धरीसी मनी अबोला
जणू आज ही सुखाची वाढे अशीच महती ॥

ही प्रीत विश्व व्यापे, सरली अनंत तापे
बदलोनी लक्ष रुपे, उरतेच हीच अंती ॥

देऊन नित्य सारे, धन द्रव्य वा ती माया
परी प्रीत दान करिता, राहील नित्य चढती ॥

ते दिवस सोनियाचे, ते विश्व भावनांचे
ते मेघ रे स्मृतीचे, बघ तरळतात भवती ॥

Monday, December 04, 2006

मायमाउली

भावसुमांची भरून अंजली
शुद्ध भक्तीची माळ गुंफिलीन
तमस्तक मी तुझ्या पाऊली
येई येई गे माय माउली..

विशुद्ध अंतर पूजा करिते
मृदुल मनी आरास सजविते
संत,शूरांची स्मृती आळविते
हो प्रसन्न हे मराठी माते

या विश्वाच्या कवन्या कोणी
वा जावो यवनांच्या योनी
साद तुझी गं रंगवी मनी
स्फुल्लिंग फुलवी महाराष्ट्र जीवनी..

मायबोली तव अफाट किमया
दिली मजला मातेची माया
तेज देह प्रखर राष्ट्र कराया
विनविते यास्तव ही शब्दप्रिया..

जोडगोळी

एक आहे आजी, तिची एक आहे नात।
तुम्ही म्हणाल, 'हात् तिच्या', एवढं काय त्यात?

आजवर कित्ती कित्ती वाट पाहिली तिची।
बोलली नाही कोणाजवळ, काढे समजूत स्वतःची।

पण एक सांगते बाई, आजीला नाही घाई।
होईल केव्हा मोठी म्हणून वाट पाहत राही।

पाहून रुपडे छान छकुले, मन येते भरून।
तृप्ती उरी सलते तरीही नसलेल्यांना स्मरून।

अंगठा तोंडात घालून अशी, चराचरा चोखते।
वेडी होऊन आजी बघतच बसते।

आजी गाते गोड गाणी, लावून आपला गळा।
समजल्यागत नात हसते, करते सुंदर चाळा।

हात-पाय हलवते असे, पाहतच रहावे वाटते।
लागू नये दृष्ट म्हणून, मीठ-मोहरी टाकते।

नात आहे इवली इवली, तिला कळते सारे।
नातीचे अपूर्व आगमन, आजीला भारी प्यारे ।

Monday, October 30, 2006

मायभू

गे मातृभूमी देवते, मी नित्य तुला वंदिते
नतमस्तक तव चरणासी, होऊन सदा विनविते ॥

या अखंड पृथ्वीतलावरी, उल्लंघुनि शत सागरी
गेले गिरी वा कंदरी, बस एक आस या उरी
तव दर्शन व्हावे नेत्रा ॥

हा अचल हिमाचल सदा, देतसे अभय प्रेमदा
गंगा यमुना कावेरी, भीमा गोदा नर्मदा ॥

नानाविध इथल्या बोली, नानाविध अंतःकरणे,
नानाविध वेषभूषांची नानाविध इथली वसने
नानाविध समुदायांची नानाविध धर्मकारणे ॥

बहुभाषिक बहुराज्यांची बहुमोल राज्यसंपदा
बहु मंदिर बहु मशीदीतून जयघोष तुझा सर्वदा
बहु असली जरी ही हृदये तरी प्राण तूच गे सुखदा ॥

लाभो अनंत जन्मीचा सहवास तुझा प्रियसा
लाभो असंख्य कार्यास्तव गे स्नेह तुझा मधुरसा
लाभो अनंत गे माये, मृत्तिकास्पर्श अवीटसा ॥

Thursday, October 12, 2006

एकटी

जे जमले मला ते मी केले
जे हाती होते ते हातचे न राखता दिले!!
या साऱ्या दिवसांमध्ये मला जे वाटले
ते सारे सच्चेपणानं मनापासून बोलले
मनात काही न ठेवता मनमोकळी वागले
माझे तुम्हाला समजून हक्काने वावरले!!
वाटले मला 'आई आई' म्हणत कशी बिलगतात
नि निर्धास्तपणे मायेच्या पंखाखाली कशी विसावतात
जगातल्या साऱ्याचं जणी चुकीचेच वागतात
मलाच वेडीला नाही कळले, त्याच योग्य असतात!!
माझे वेडेपण मज जवळ ठेवून मी अलिप्त होईन
तुम्हा साऱ्यांच्या मार्गातून दूर दूर जाईन
कुठे ही असले तरीही तुम्हा आशीर्वादच देईन
आहे आयुष्या तोवर तुमचेच हित पाहीन!!
तुम्ही सुखी-आनंदी राहावे एकच आस अंतरी
याचस्तव परमेशा भजेन सांजसकाळ मंदिरी
मागे तुमच्या उभी असेन आपदा वा संगरी
दूर होईन तुम्हा पासून तना-मनाने निश्चित तरी!!